जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्यास तीन महिने मुदतवाढ : जीएसटी वार्षिक रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी देशभरातील तमाम व्यापारी उद्योगजगताकडून सातत्याने होत होती. 31 ऑगस्ट, 2019 अखेर असलेली ही मुदत तीन महिन्याने वाढवून ती 3…
- जीएसटी वार्षिक रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी देशभरातील तमाम व्यापारी उद्योगजगताकडून सातत्याने होत होती. 31 ऑगस्ट, 2019 अखेर असलेली ही मुदत तीन महिन्याने वाढवून ती 30 नोव्हेंबर 2019 करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. राष्ट्रीय स्तरावर जीएसटी प्रणाली लागू केल्यानंतर या प्रणालीमध्ये गेल्या दोन वर्षात विविध सुधारणा करण्यात आल्या.
- या नवीन असलेल्या करप्रणाली अनुसार हे रिटर्न भरणे व्यापारी उद्योजक, कर सल्लागार यासाठीसुद्धा जिकिरीचे होते. तसेच त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरची व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था फिक्की, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
देशभरात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार :
- केंद्र सरकारने देशभरात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत यास मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. या वैद्यकीय महाविद्यालयांची २०२१-२२ पर्यंत उभारणी होणार असून, ज्या ठिकाणी अशी महाविद्यालये नाहीत अशा ठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.
- यावेळी केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी सांगितले की, नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी २४ हजार ३७५ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये एमबीबीएसच्या १५ हजार ७०० जागा असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हा सर्वात मोठी विस्तार आहे.
- याचबरोबर केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाख मॅट्रिक टन उत्पादनासाठी सबसिडी देण्याचा आणि साखर निर्यातीचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण घेतला आहे. त्यानुसार ६० लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीवर केंद्र सरकारने ६ हजार २६८ कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे.
चार वर्षांच्या विवानला २०२ देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख :
- वाशीम जिल्हय़ातील अनसिंग येथील विवान सरनाईक या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडय़ाला चक्क २०२ देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख आहे. सर्वात कमी वयातील विविध सहा विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केले आहेत. विवानच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन चेन्नई येथील तामिळ विद्यापीठाने त्याला मानद आचार्य पदवी प्रदान केली.
- अनसिंग येथील रहिवासी डॉ. पराग व डॉ. योगीता सरनाईक यांचा मुलगा विवानने आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर अत्यंत लहान वयात सहा विश्वविक्रम केले. वेळेत व्यासपीठावरून हजारो जनसमुदासमोर सर्वात कमी वयात राष्ट्रगीत, वंदे मातरम्चे सादरीकरण, चिमुकल्या वयात २०२ देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख, अत्यल्प वेळेत १०० राष्ट्रध्वजांची ओळख, एका मिनिटांत ८५ देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख आदी विक्रम विवानने केले आहेत.
- त्याची नोंद विविध ‘रेकॉर्ड बुक’मध्ये घेण्यात आली. त्याने सुमारे आठ महिन्यात पाच विश्वविक्रम प्रस्थापित केले. सहावा विश्वविक्रम करून त्याने आपलाच पहिला विक्रम मोडीत काढत एका मिनिटात ८५ विविध देशांचे राष्ट्रीय ध्वज ओळखले, असे त्याचे वडील डॉ. पराग सरनाईक यांनी सांगितले.
- विवानच्या कर्तृत्वाची दखल चेन्नई येथील तामिळ विद्यापीठाने घेतली. अल्पवयात विविध विक्रम करणाऱ्या विवानला तामिळ विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते २५ ऑगस्टला चेन्नई येथे मानद आचार्य पदवी बहाल करण्यात आले.
बालकल्याण निर्देशांकामध्ये केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश अव्वल :
- भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ‘चाईल्ड वेल-बीइंग इंडेक्स’ म्हणजेच ‘बालकल्याण निर्देशांक’ जाहीर करण्यात आला आहे. वर्ल्ड व्हिजन इंडिया आणि IFMR लीड या स्वयंसेवी संस्थांनी हा निर्देशांक तयार केला आहे. हा निर्देशांक म्हणजे निरोगी वैयक्तिक विकास, सकारात्मक संबंध आणि संरक्षणात्मक वातावरण या तीन आयामी घटकांच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेले एक साधन आहे.
अहवालातल्या ठळक बाबी
1) आरोग्य, पोषण आणि शिक्षण सुविधांमधल्या अपवादात्मक कामगिरीमुळे केरळ राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे. केरळच्या पाठोपाठ तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना स्थान मिळाले आहेत.
2) कुपोषण आणि बालकांचा कमी जन्मदर यामुळे मेघालय, झारखंड आणि मध्यप्रदेश यादीत तळाशी आहेत.
3) केंद्रशासित प्रदेशांमध्ये, पुडुचेरीने सर्वाधिक गुण मिळवले आहेत आणि ते अव्वल ठरले. तर दादरा व नगर हवेली कमकुवत कामगिरी दर्शविणारे प्रदेश ठरले.
4) केरळमध्ये बालकांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. तसेच कुपोषण, कमी जन्मदर अश्या मुद्द्यांवर प्रभावी कार्य केलेले आहे. त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छता सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
5) झारखंडमध्ये जन्मदर, पोषण आणि पाणी आणि स्वच्छता सुविधांची उपलब्धता अश्या घटकांवर लक्षणीय सुधारणा करण्याची गरज आहे. राज्यात अधिकाधिक बालकांमध्ये खुंटलेली वाढ आणि कमी वजन ह्या समस्या दिसून आल्या आहेत. तसेच राज्यात प्रसूतीगृहांची उपलब्धता कमी आहे. पाच वर्षांची होण्यापूर्वीच मृत्यू होणार्या बालकांची संख्या जास्त आहे. राज्यात शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे.
6) मध्यप्रदेशात जन्मदर, पोषण, बालकांच्या विरुद्ध गुन्हेगारी आणि किशोरवयीन गुन्हे अशा बाबींमध्ये निम्न कामगिरी दिसून आली आहे. राज्यात दरिद्री कुटुंबात राहणार्या बालकांची संख्या सर्वाधिक आहे.
No comments