भारत रशियाकडून ‘आर -२७’ क्षेपणास्त्रांची खरेदी करणार : भारतीय वायु सेनेने रशियाकडून १५०० कोटी रूपयांच्या ‘आर -२७’ या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या क्षेपणास्त्रांचे वजन २५३ किलो आहे. तर २५ किलोमीट…
भारत रशियाकडून ‘आर -२७’ क्षेपणास्त्रांची खरेदी करणार :
- भारतीय वायु सेनेने रशियाकडून १५०० कोटी रूपयांच्या ‘आर -२७’ या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या क्षेपणास्त्रांचे वजन २५३ किलो आहे. तर २५ किलोमीटर उंचीवरून ६० किलोमीटर लांब पर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
- भारत आणि रशिया या दोन राष्ट्रात मागिल काही दिवसातच झालेला हा दुसरा मोठा व्यवहार आहे. या अगोदर भारताने रशियाकडून २०० कोटींच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे. ही क्षेपणास्त्रे एसयू -३० एमकेआय लढाऊ विमानांवर बसविण्यात येणार आहेत.
- रशियाने ही क्षेपणास्त्रे मिग आणि सुखोई मालिकेतील लढाऊ विमानांना जोडण्यासाठी तयार केली आहेत. यांच्या खरेदीमुळे आता भारताची मध्यम आणि लांब पल्ल्यापर्यंत क्षेपणास्त्राद्वारे मारा करण्याची क्षमता वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक शस्त्र खरेदीस मंजूरी देण्यात आल्याच्या ५० दिवसांच्या आतच भारतीय वायुसेनेने आतापर्यंत शस्त्र सामुग्रीवर तब्बल ७ हजार ६०० कोटी रूपयांपर्यंतचा व्यवहार केला आहे.
चांद्रयान-२ चंद्रापासून फक्त तीन पावलं दूर :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सोमवारी तिसऱ्यांदा यशस्वीरित्या चांद्रयान-२ ची कक्षा बदलली. चांद्रयान-२ चंद्रापासून आता फक्त तीन पावलं दूर आहे. इस्त्रोने टि्वट करुन कक्षा बदलाची माहिती दिली. कक्षा बदलाचा हा तिसरा टप्पा होता. चांद्रयान २ ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी चांद्रयान २ ची कक्षा बदलून पृथ्वीपासून २५१ किमी अंतरावर नेण्यात आले. सात सप्टेंबर रोजी चांद्रयान २ चंद्रावर उतरणार आहे.
- २२ जुलै रोजी अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान (पेरिजी) १७० किमी व कमाल (एपोजी) ४५ हजार १४७५ किमी अंतरावर स्थिरावण्यात आले होते. आणखी दोन वेळा चांद्रयान २ च्या कक्षेमध्ये बदल करण्यात येणार आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान २ ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान २ मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता दोन आणि सहा ऑगस्टला हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल.
- १४ ऑगस्टला चांद्रयान २ चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. २० ऑगस्टला चांद्रयान २ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान २ मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान २ चा प्रयत्न असेल.
पाकिस्तान 2022 ला पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार :
- भारताने ‘चंद्रयान-2’ चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर पाकिस्तानने आता 2022 पर्यंत पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची घोषणा केली आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान पुढील चार वर्षांमध्ये पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवणार असल्याची माहिती पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे.
- अवकाशात अंतराळवीर पाठवण्याच्या पाकिस्तानच्या या पहिल्या महत्वकांशी मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड प्रक्रिया पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होईल अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे. निवड प्रक्रियेमध्ये 50 जणांची निवड केली जाईल. त्यामधून अंतिम 25 जण निवडले जातील. ‘2022 मध्ये आम्ही आमच्या देशातील पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहोत. देशाच्या अंतराळ संशोधनासंदर्भातील हा सर्वात महत्वाचा क्षण असेल,’ असे ट्विट चौधरी यांनी केले.
वैद्यकीय व्यवसायासाठी आता "नेक्स्ट' :
- महत्त्वाकांक्षी "राष्ट्रीय वैद्यकीय आयोग' विधेयक लोकसभेने आज मंजूर केले. भारतातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची बनविण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला.
- राज्यसभेनेही यावर शिक्कामोर्तब केल्यास वैद्यकीय शिक्षणाठी यापुढे फक्त "नीट' ही एकच प्रवेश परीक्षा असेल. शिवाय वैद्यकीय व्यवसायासाठीही "नॅशनल एक्झिट टेस्ट' (नेक्स्ट) ही प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असेल.
- मंत्रिमंडळाने दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (नॅशनल मेडिकल कमिशन) स्थापन करण्यासाठीच्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली दिली होती. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हे विधेयक मंजुरीसाठी मांडल्यानंतर कॉंग्रेस, द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस या पक्षांनी विरोध दर्शविताना या विधेयकाची छाननी होण्याची आवश्यकता बोलून दाखविली होती. या विधेयकाला डॉक्टरांनी तीव्र विरोध व्यक्त केला आहे. एखाद्या विद्यार्थ्याला "नेक्स्ट' परीक्षा देता न आल्यास त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. विधेयकामध्ये दुसऱ्या पर्यायाचा उल्लेख नसल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. विरोधकांनी याकडेही सरकारचे लक्ष वेधले.
- विधेयकावर झालेल्या चर्चेच्या उत्तरात डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले, की विद्यमान राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची व्यवस्था संपुष्टात येईल आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग परिषदेची जागा घेईल. या आयोगाला खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया त्याचप्रमाणे 50 टक्के जागांच्या शुल्क नियंत्रणाचे अधिकार आयोगाला असतील. वैद्यकीय व्यावसायिकांना आपल्या क्षेत्रातील संशोधनाला आयोग प्रोत्साहन देईल. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयांचे मूल्यांकनही आयोगातर्फे केले जाईल. याअंतर्गत केंद्र सरकारला सल्लागार परिषद बनविण्याचे अधिकार मिळणार असून, या व्यासपीठावर राज्यांना आपल्या अडचणी मांडण्याची संधी मिळेल.
नव्या विधेयकानुसार...
- वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त "नीट' ही एकमेव प्रवेश परीक्षा.
- राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामध्ये चार स्वायत्त मंडळे.
- "एमबीबीएस'ची शेवटच्या वर्षाची परीक्षा "नॅशनल एक्झिट टेस्ट' (नेक्स्ट).
- वैद्यकीय व्यवसायाच्या परवान्यासाठी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची "नेक्स्ट' ही प्रवेश परीक्षा.
- परदेशातील वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठीही ही परीक्षा आवश्यक.
भारताच्या क्रिकेट मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती ऑगस्ट महिन्यात :
- विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीकडे भारताच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदासाठीच्या मुलाखती ऑगस्टच्या मध्यावर होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने 26 जुलैला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
- कपिल यांच्यासह या समितीवर माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे. ‘त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती पुरुषांच्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. ऑगस्ट महिन्यात मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होईल. ही प्रभारी समिती नाही; परंतु या तिघांचे कोणतेही हितसंबंध नाहीत,’ असे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अरुण, बांगर आणि श्रीधरन यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
No comments