नासा- इस्रोच्या सौरमाला मोहिमेचा प्रस्ताव : चांद्रयान २ मोहिमेतून अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेलाही प्रेरणा मिळाली आहे. यापुढे इस्रोसमवेत सौर मालेचे संशोधन करण्यासाठी संयुक्त संशोधन मोहिमा राबवण्यास आम्ही तयार आहोत, असे नासाने …
- चांद्रयान २ मोहिमेतून अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेलाही प्रेरणा मिळाली आहे. यापुढे इस्रोसमवेत सौर मालेचे संशोधन करण्यासाठी संयुक्त संशोधन मोहिमा राबवण्यास आम्ही तयार आहोत, असे नासाने स्पष्ट केले.
- चांद्रयान २ या मोहिमेत भारताने केलेल्या कामगिरीचे नासाने कौतुक करताना म्हटले आहे,की अवकाश मोहिमा कठीणच असतात. चांद्रयान २ मोहिमेत यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते पण त्यात अपयश आले असले तरी जो टप्पा गाठला गेला तेही काही कमी महत्त्वाचे नाही.
- ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकारी अलाइस जी वेल्स यांनी सांगितले, की चांद्रयान २ मोहिमेत इस्रोने केलेले प्रयत्न हे मोलाचे आहेत. त्यासाठी इस्रोचे आम्ही अभिनंदन करतो. भारतासाठी हे मोठे पाऊल आहे. वैज्ञानिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली बरीच माहिती यातून निर्माण होणार आहे. भारत त्याच्या आशाआकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे.
- नासाचे माजी अवकाशवीर जेरी लिनेन्गर यांनी असे म्हटले आहे, की भारताने चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा केलेला प्रयत्न महत्त्वाचा होता. त्यात अपयश आले असले तरी या अनुभवाचा फायदा पुढील मोहिमात होणार आहे, त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. भारताने अतिशय अवघड अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लँडर चांद्रभूमीवर उतरत असताना सुरूवातीला सर्व काही व्यवस्थित पार पडले पण नंतर ते नियंत्रणाबाहेर गेले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकन ओपन : नदालने पटकाविले 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद
- स्पेनचा मातब्बर टेनिसपटू रॅफेल नदाल याने कारकिर्दीतील एकोणिसावे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविले. अमेरिका ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने डॅनील मेदवेदेव या रशियन आव्हानवीराला पाच सेटमध्ये हरवून बाजी मारली. नदालने 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा विजय संपादन केला. हा सामना 4 तास 49 मिनिटे चालला.
- दोन सेटच्या आघडीनंतर नदालने क्वचितच हार मानली आहे, तर मेदवेदेव याला पाच सेटमध्ये अद्याप या पातळीवर विजय मिळविता आलेला नाही. मेदवेदेवचा उत्तर अमेरिकन हार्डकोर्ट मोसमातील 23 सामन्यांतील हा तिसराच पराभव आहे. मोक्याच्या क्षणी मात्र नदालने त्याला आपला दर्जा दाखवून दिला.
- नदालचे हे कारकिर्दीतील एकोणिसावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे. याबरोबरच तो आणि स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर यांच्यातील फरक केवळ एक पर्यंत कमी झाला. फेडररच्या खात्यात वीस विजेतीपदे आहेत. नादलचे हे चौथे अमेरिकन विजेतेपद आहे. नदालने यापूर्वी 2017, 2013 आणि 2010 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
इस्त्रो पुन्हा घेणार चंद्रभरारी :
- चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले असून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत. लँडर चांद्रभूमीपासून अवघ्या 2.1 कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला.
- तर एकीकडे लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न पुढील 14 दिवसांमध्ये केला जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली आहे. एकीकडे चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरची संपर्काचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्त्रो आता पुढच्या चंद्र मोहिमेसाठी तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
- इस्त्रोचे ही नवीन चंद्र मोहिम चांद्रयान-2 मोहिमेपेक्षा अधिक अत्याधुनिक असणार आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या ध्रुवीय भागावरील मातीचे नमून गोळा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जपान आणि भारताची अवकाश संशोधन संस्था संयुक्तरित्या ही मोहिम राबवणार आहे.
- भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आणि जपानची अवकाश संशोधन संस्था ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (जेएएक्सए) एकत्रपणे या मोहिमेत काम करणार आहेत. 2024 मध्ये इस्त्रो आणि जाक्सा या मोहिमेवर काम सुरु करणार आहे. याआधी भारत 2022 ला गगनयान मोहिम पूर्ण करणार आहे. या मोहिमेमध्ये इस्त्रो भारताचा पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. या संयुक्त मोहिमेची चर्चा पहिल्यांदा 2017 साली झाली होती.
WEFच्या प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 34 व्या क्रमांकावर :
- जागतिक आर्थिक मंचाने (WEF) त्याचा ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल’ प्रसिद्ध केला आहे, ज्यात जागतिक पातळीवर पर्यटनासंबंधीची 140 देशांची क्षमता नमूद करण्यात आली आहे.
- अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारत आपल्या समृद्ध नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांमुळे सहा जागांची उडी घेत 34 व्या क्रमांकावर आला आहे.
- भारत यादीतल्या अव्वल 35 देशांमध्ये असणारा एकमेव अल्प-मध्यम उत्पन्न असलेला देश आहे. हवाई पायाभूत सुविधा (33) आणि भू आणि बंदरे पायाभूत सुविधा (28), आंतरराष्ट्रीय मुक्तता (51), नैसर्गिक (14) आणि सांस्कृतिक संसाधने (8) या घटकांच्या बाबतीत भारताने चांगली प्रगती दर्शविलेली आहे.
- यादीत स्पेन हा देश अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ फ्रान्स, जर्मनी आणि जापान या देशांचा क्रमांक लागतो आहे.
- या वर्षीच्या क्रमवारीत आशिया-प्रशांत क्षेत्र प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता या बाबतीत सर्वाधिक वेगाने वाढणार्या क्षेत्रापैकी एक होता. जापान हे देश आशियातली सर्वाधिक स्पर्धात्मक प्रवास व पर्यटन अर्थव्यवस्था ठरली असून त्याचा जगभरात चौथा क्रमांक लागतो आहे.
No comments