माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन: भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट 2019 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी झाला. त्या…
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन :
- भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट 2019 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.
- अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून विधीची पदवी घेतली. त्यांनी 26 मे 2014 ते 14 मे 2018 या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. शिवाय 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 या काळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होती. याशिवाय 3 जून 2009 ते 26 मे 2014 या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.
- जेटली यांचे पुढील घटनांमध्ये मोठे योगदान होते - GST आणि IBC सारख्या मोठ्या सुधारणा; तूट असलेल्या बँकांचे विलिनीकरण; FDI नियम सोप्पे केले; भारतातली परकीय गुंतवणूक वाढविण्यात यश; महागाई 2.2 वरून 2.9 टक्क्यांवर आणण्यामध्ये योगदान; अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेमध्ये बदल; रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट करणे; काळा पैसा आणि बेहिशेबी मालमत्ता कायद्याची अंमलबजावणी; देशाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी योगदान; बँकांमधील अकार्यक्षम मालमत्ता कमी करण्यात यश; पंतप्रधानांसोबत जन-धन खाते योजना प्रत्यक्षात आणली; आधारसह थेट लाभ योजना; चलनविषयक धोरण समितीच्या स्थापनेत योगदान.
मनमोहन सिंग: राज्यस्थानमधून राज्यसभेचे सदस्य
- 23 ऑगस्ट 2019 रोजी माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ कॉँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी संसद भवनात राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
- माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ कॉँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राज्यस्थानमधून अर्ज भरला होता. राज्यसभेचे सदस्य, भाजप नेते मदन लाल साहनी यांचा जून महिन्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घेतली गेली होती. 19 ऑगस्टला सिंग बिनविरोध निवडले गेले. भाजपाने कोणताही उमेदवार न दिल्याने सिंग बिनविरोध निवडले गेले.
- गेल्या वर्षी मार्च महिन्यात राज्यसभेवर निवडून आल्यानंतर साहनी यांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2024 पर्यंतचा होता. 86 वर्षांचे मनमोहन सिंग साहनी यांच्या उर्वरित कार्यकाळात काम करणार आहेत.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धात सिंधूची फायनलमध्ये धडक :
- भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफेईवर 21-07, 21-14 असा दणदणीत विजय मिळवला. तर या विजयासह सिंधूचे या स्पर्धेतील रौप्यपदक पक्के झाले आहे.
- या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने आतापर्यंत तिसऱ्यांदाच प्रवेश केला आहे. यापूर्वी झालेल्या दोन अंतिम फेऱ्यांमध्ये सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत सिंधूच्या खात्यामध्ये आता पाच पदके झाली आहेत.
- सिंधूने यापूर्वी दोन रौप्यपदकसांह दोन कांस्यपदकेही पटकावली होती. आज उपांत्य फेरीत विजय मिळवत सिंधूने रौप्य पदक निश्चित केले आहे.
UAE मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच पंतप्रधान मोदींच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- तर यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. यूएईने एप्रिल महिन्यात या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा केली होती.
No comments