आकाशगंगेतील 28 नवीन ताऱ्यांचा शोध : आपल्या आकाशगंगेतील 28 नवे तारे येथील आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत.तर या संस्थेचे संचालक वहाब उद्दीन यांनी सांगितले की, हे या त…
आकाशगंगेतील 28 नवीन ताऱ्यांचा शोध :
- आपल्या आकाशगंगेतील 28 नवे तारे येथील आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. तर या संस्थेचे संचालक वहाब उद्दीन यांनी सांगितले की, हे या ताऱ्यांची प्रकाशमानता सतत बदलत असते, हे संशोधन ही दुर्मिळ कामगिरी आहे.
- तसेच ग्लोब्युलर क्लस्टर एनजीसी 4147 मध्ये हे तारे सापडले असून कोमा बेरनायसेस तारकासमूहात ते आहेत. यात डॉ. स्नेहलता, डॉ. ए.के.पांडे यांनी एनजीसी 4147 ग्लोब्युलर क्लस्टरची फोटोमेट्रिक निरीक्षणे घेतली. त्यासाठी 3.6 मीटरच्या देवस्थळ प्रकाशीय दुर्बीणाचा वापर केला आहे.
- ग्लोब्युलर क्लस्टर हा ताऱ्यांचा गोलाकृती संच असून तो आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे. ग्लोब्युलर क्लस्टर हे गुरुत्वाकर्षणाने बद्ध असतात. त्यामुळे त्यांना गोलाकार प्राप्त होतो. त्यांची तारकीय घनता जास्त असते. ही क्लस्टर्स आकाशगंगेच्या प्रभामंडळात असतात व त्यात जुने तारे असतात, पण त्यांचा आकाशगंगेच्या उत्क्रांतीतील भाग स्पष्ट झालेला नाही. हे संशोधन अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये ऑगस्ट महिन्यात प्रकाशित होणार आहे.
भारतीय खेळाडूंनी पटकावली आठ पदके :
- बॅँकॉक येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या आशिष कुमारने 75 किलो गटात सुवर्णपदक पटकावले. आशिषचे हे पहिलेच आंतरराष्टीय सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्यपदकांसह आठ पदके पटकावली.
- तर या स्पर्धेत भारताची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली. या स्पर्धेत 37 देशांतील सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्ध्यांनी सहभाग घेतला होता. भारताच्या माजी ज्यु. चॅम्पियन निकहत झरीन, दीपक, मोहम्मद हसमुद्दीन व बृजेश यादव यांनी रौप्यपदक पटकावले. निकहतला आशियाई सुवर्णविजेती चांग युवान हिने चांगली लढत दिली. चीनच्या या खेळाडूने निकहतला 5-1 असे पराभूत केले. निकहतने आशियाई चॅम्पियशिप व इंडिया ओपनमध्ये कांस्यपदक मिळवले होते.
- तर 56 किलो गटात मोहम्मद हसमुद्दीन याला थायलंडच्या चाचाई देचा बुतदी याच्याकडून पराभूत व्हावे लागले, तर उजबेकिस्तानच्या मिर्जाखमेदोव नोदिरजोन याने दीपकला ४९ किलो वजनगटात पराभूत केले. 81 किलो वजन गटात बृजेश यादवने आपली सर्व ताकद पणाला लावली; मात्र त्याला थायलंडच्या अनावत थोंगक्रातोक याने 4-1 असे पराभूत केले.
रशियन कंपनीची महाराष्ट्रात 6,800 कोटींची गुंतवणूक :
- रशियन स्टील कंपनी, नोवोलिपस्टेक स्टील (एनएलएमके) महाराष्ट्रात 6,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 2022 पर्यत दोन टप्प्यात नोवोलिपस्टेक ही गुंतवणूक करणार आहे. कंपनी महाराष्ट्रात आपला पहिलाच कारखाना सुरू करणार आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद जवळच्या शेंद्रा किंवा बिडकीन औद्योगिक वसाहतीत (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) या प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे.
- महाराष्ट्र सरकार राज्यात कारखाना सुरू करण्यासाठी रशियन स्टील कंपनीला सर्व प्रकारचे सहकार्य देईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. पहिल्या टप्प्यात 800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तर 2022 पासून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार असून त्यात 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
- रशियन कंपनीचे वरिष्ठ संचालक आणि मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी यासंदर्भातील बैठक झाली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्यांनी रशियन कंपनीला सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले. नोवोलिपस्टेक जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक पोलादाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
- मागील 30 वर्षात महाराष्ट्रातील वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक सब-स्टेशनची मागणीसुद्धा 30 पटींनी वाढली आहे. नोवोलिपस्टेक स्टील कंपनी वीजेच्या वापरासाठी आणि ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशिष्ट प्रकारचे पोलाद बनवते. सध्या नोवोलिपस्टेक राज्यातील 20 टक्के ट्रान्सफॉर्मर पोलाद पुरवते. प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशात अन्यत्रसुद्धा या पोलादाचा पुरवठा केला जाणार आहे
जगातील बलाढ्य आपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात :
- जगातील बलाढ्य समजले जाणारे आपाचे हेलिकॉप्टर भारताच्या ताफ्यात दाखल झाले आहे. पहिल्या ताफ्यातील बोईंग एएच-64 ई आपाचे गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसमध्ये दाखल झाले आहे. आता हे हेलिकॉप्टर पठाणकोट येथे रवाना केले जाणार आहे.
- तर ही हेलिकॉप्टर्स हवाईदलाच्या MI-35 चॉपर्सची जागा घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात बलाढ्य अशी चार आपाचे हेलिकॉप्टर्स भारताच्या ताफ्यात दाखल झाली असून एकूण चार टप्प्यात सर्व हेलिकॉप्टर्स भारताला मिळणार आहेत. तसेच आपाचे हेलिकॉप्टर्सची निर्मिती अमेरिकेत करण्यात आली आहे. भारताने अमेरिकेबरोबर 22 आपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा करार केला आहे.
- यापूर्वी हवाईदलाच्या ताफ्यात चिनूक हेविवेट हेलिकॉप्टर्सही दाखल झाले आहेत. सध्या हे हेलिकॉप्टर्स केवळ इस्त्रायल, रशिया आणि नेदरलँडकडेच आहेत. दरम्यान, ही हेलिकॉप्टर्स चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे. जंगल आणि डोगराळ भागांमध्ये शत्रूंचा सामना करण्यासाठी या हेलिकॉप्टर्सची मदत मिळणार आहे. आपाचे हेलिकॉप्टर अमेरिकन सैन्याचे अडव्हान्स अटॅक हेलिकॉप्टर प्रोग्रामचा भाग आहे.
- AH-64 आपाचे हेलिकॉप्टर जगभरात युद्धासाठी वापरले जाणारे मल्टी रोल हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकन सैन्या या हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. परंतु आता या हेलिकॉप्टर्सचा वापर करणाऱ्या देशांची संख्या वाढली आहे.सध्या कंपनीने अन्य देशांना 2 हजार 100 आपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा केला आहे.
- तसेच 1984 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या सैन्यादलात या हेलिकॉप्टरला सामिल करण्यात आले. सध्या भारत रशियाने तयार केलेली एमआय 35 हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. परंतु आता ही हेलिकॉप्टर्स सेवेतून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. शत्रूच्या सीमेत घुसुन हल्ला करण्याच्या दृष्टीने या हेलिकॉप्टरचे डिझाइन करण्यात आले आहे. इस्त्रायलदेखील लेबनान आणि गाझा पट्ट्यात आपल्या सैनिकी कारवायांदरम्यान या हेलिकॉप्टरचा वापर करतो.
तुलसी गबार्ड यांची गुगलला नोटीस :
- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणून डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या तुलसी गबार्ड यांनी गुगलला 500 कोटी डॉलरची नोटीस बजावली आहे. गुगलने सहा तासांसाठी प्रचाराचे अकाउंट बंद केल्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावर प्रचारावर परिणाम झाला, असा आरोप गबार्ड यांनी केला आहे.
- गबार्ड या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांचे अकाउंट 27 आणि 28 जूनदरम्यान सहा तासांसाठी बंद करण्यात आले होते. यामुळे जाहिराती मिळविण्यास आणि मतदात्यांपर्यंत पोहोचण्यास गबार्ड यांना अडचण आली. 'गुगलने माझ्यासोबत भेदभाव केला असून, माझ्या प्रचारावर गुगलच्या निर्बंधांचा परिणाम झाला आहे,' असे मत गबार्ड यांनी व्यक्त केले आहे.
- 'गुगल जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असेल, तर हा निश्चित आमच्या लोकशाहीला धोका आहे. अमेरिकी नागरिकांच्या हक्कांसाठी गुगलविरोधात लढेन,' असेही गबार्ड यांनी स्पष्ट केले आहे.
No comments