भारताची चांद्रझेप यशस्वी : कोटय़वधी भारतीयांच्या आशा-आकांक्षांना पंखांत घेऊन ‘चांद्रयान-2’ सोमवारी दुपारी 2.43 वाजता येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून अवकाशात झेपावले आणि सर्व भारतीयांचा ऊर वैज्ञानिकांच्या या पराक्रमाने भरून आला.चेन…
भारताची
चांद्रझेप यशस्वी :
- कोटय़वधी भारतीयांच्या आशा-आकांक्षांना पंखांत घेऊन ‘चांद्रयान-2’ सोमवारी दुपारी 2.43 वाजता येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून अवकाशात झेपावले आणि सर्व भारतीयांचा ऊर वैज्ञानिकांच्या या पराक्रमाने भरून आला.
- चेन्नईपासून 100 किलोमीटरवर असलेल्या श्रीहरिकोटा येथून ‘जीएसएलव्ही एमके 3’ या बाहुबली प्रक्षेपकाने ‘चांद्रयान-2’ ला कवेत घेऊन सोनेरी धूर मागे सोडत अवकाशझेप घेतली. प्रक्षेपकातील बिघाडामुळे ‘चांद्रयान-2’ चे उड्डाण 15 जुलै रोजी उड्डाणाच्या 56 मिनिटे आधी स्थगित करावे लागले होते.
- तसेच प्रक्षेपकातील बिघाड आठ दिवसांत शोधून दूर करण्यात आला आणि ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या प्रक्षेपकाच्या मदतीने ‘चांद्रयान-2’ने यशस्वी झेप घेतली.
- चांद्रयान 1 मोहिमेनंतर 11 वर्षांनी चांद्रयान-2 मोहीम हाती घेण्यात आली. चांद्रयान 1 मोहिमेतील यानाने चंद्राला 3400 प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि ते 29 ऑगस्ट 2009 पर्यंत कार्यरत होते. त्याने 312 दिवस काम केले. तर ‘चांद्रयान-2’ 365 दिवस काम करणार आहे.
- ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या बाहुबली भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाने ‘चांद्रयान-2’ला अवकाशात सोडले. 4 टनाचे उपग्रह सोडण्यासाठी असा शक्तिशाली प्रक्षेपक आवश्यक असतो. त्याची उंची 4343 मीटर म्हणजे 15 मजली इमारतीएवढी आहे.त्याच्या हेलियम टाकीत दाब कमी झाल्याने आधीचे उड्डाण ऐनवेळी स्थगित करण्यात आले होते.
- तर चांद्रयान-2 आता २ सप्टेंबर रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या प्रवासात एकूण 15 अवघड प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. हे यान सरतेशेवटी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्या भागात अजून अमेरिका, रशिया किंवा चीननेही यान उतरवलेले नाही.
- चांद्रयान-2 उड्डाणानंतर अपेक्षेप्रमाणे 4.20 मिनिटांत पृथ्वीनिकटच्या 170 गुणिले 39059 किमी कक्षेत प्रस्थापित झाले. येत्या 48 दिवसांत अनेक अवघड प्रक्रिया पार पाडल्यानंतर यानाच्या कक्षा रुंदावून ते 23 दिवसांत चंद्राच्या दिशेने कूच करेल. आधी ही प्रक्रिया 17 दिवसांत होणार होती.
- तर आता यान पृथ्वीच्या कक्षेत असून नंतर त्याची कक्षा 1.05 लाख कि.मी.पर्यंत वाढवण्यात येणार आहे. नंतर ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करील. तेथील 100 गुणिले 100 कि.मी. कक्षेत गेल्यानंतर ते घिरटय़ा घालत राहील आणि कालांतराने त्यापासून ‘लँडर’ वेगळे होईल. ‘लँडर’ चंद्रावर 7 सप्टेंबरला उतरण्याची अपेक्षा आहे.
- त्यानंतर लँडरपासून ‘रोव्हर’ वेगळे होईल. ‘लँडर’चा वेग कमी करीत ते अलगदपणे चंद्रावर उतरवणे आव्हानात्मक असून तो 15 मिनिटांचा थरार असेल. तसेच ‘लँडर’ला विक्रम (‘इस्रो’चे संस्थापक विक्रम साराभाई) यांचे नाव देण्यात आले आहे, तर ‘रोव्हर‘चे नामकरण ‘प्रज्ञान’ असे करण्यात आले आहे. ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’वर तिरंग्याचे चित्र आहे.
- तर या मोहिमेत एकूण 13 ‘पेलोड; (विज्ञान उपकरणे) असून त्यात युरोपचे तीन, अमेरिकेचे दोन आणि बल्गेरियाचा एक आहे. ‘नासा’चा ‘लेसर रेट्रोरिफ्लेक्टर अॅारे’ या मोहिमेत समाविष्ट असून त्यात चंद्राच्या अंतरंगाचा वेध घेतला जाणार आहे. तसेच यान ठरल्याप्रमाणे 6 किंवा 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरले, तर चंद्रावर स्वारी करून इतिहास घडवणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतरचा चौथा देश ठरेल.
मुकुंद नरवणे
लष्कराचे नवे उपप्रमुख :
- केंद्र सरकारने लष्करात नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापदी नियुक्ती झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहेत.
- तर सध्या पूर्व कमांडचे प्रमुख असलेले नरवणे लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. अंबू हे 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत. तसेच नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. रावत हे 31 जानेवारीला निवृत्त होत आहेत
- लेफ्टनंट जनरल नरवणे हे जून 1980 रोजी ते लष्कराच्या 7व्या शीख बटालियनमध्ये रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये काम केले आहे.
क्रिकेटमध्ये
होणार मोठा बदल :
- मैदानावरील पंचांच्या चुका आता मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातही मैदानातील पंचांचे निर्णय चुकीचे असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळेच आता क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार आहे. त्यामुळे आता थर्ड अम्पायरचे काम वाढणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
- तर बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की, नो बॉल असल्याचेही मैदानावरील पंचांना कळत नाही. त्यामुळे कधी कधी फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागते किंवा त्यांना फ्री हिटचा फायदा मिळत नाही. त्याचबोरबर मैदानावरील पंच अन्य काही गोष्टींमध्येही चुका करताना दिसतात.
- तसेच आतापर्यंत थर्ड अम्पायर रीव्ह्यूवर आपले निर्णय देत होते किंवा मैदानावरील पंच स्टम्पिंग किंवा रन आऊटसाठी थर्ड अम्पायरची मदत घेत होते. पण आता मैदानावरील पंचांच्या चुकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे थर्ड अम्पायरवरील काम वाढणार आहे.
- तर थर्ड अम्पायरवर आता नो बॉल तपासण्याची जबाबदारीही सोपवण्यात येणार असल्याचे समजते आहे. हा प्रयोग पहिल्यांदा भारतीय क्रिकेटमध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाच्या एका नो बॉलचा फटका आरसीबीच्या संघाला बसला होता. त्यामुळे आता ही नवीन गोष्ट करण्यात येणार असल्याचे समजत आहे.
अकरावी प्रवेशाची
दुसरी गुणवत्ता यादी जाहीर, कट ऑफमध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण :
- अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर झाली आहे. यामध्ये पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत सरासरी 1 ते 2 टक्क्यांनी घसरणही दुसऱ्या गुणवत्ता यादीत पाहायला मिळत आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
- या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी या सर्व शाखांसाठी 1,07,785 विद्यार्थ्यांपैकी एकूण 69170 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले असून यामध्ये 16337 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे.
- पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळल्यामध्ये आर्टस् 1972, कॉमर्स 9890, सायन्स 4130 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले त्यांना या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य असणार आहे. तर इतर ज्या विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये कॉलेज मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांनी 25 जुलै दुपारी 3 वाजेपर्यंत आपले प्रवेश आपल्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन निश्चित करायचे आहेत.
- दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये एसएससीच्या 63600 विद्यार्थ्यांना, सीबीएसई 1845 विद्यार्थ्यांना तर आयसीएसईच्या 2454 विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक 2 ते 10 मधील कॉलेज मिळाले आहे आणि या फेरीमध्ये प्रवेश घ्यायचा नसल्यास त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये उरलेल्या जागांसाठी प्रवेश घेता येईल.
No comments